
Piyushri Kishor Devgirkar
पीयूश्री ही अमित इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी असून दहावीच्या परीक्षेत तिने ९४.४० टक्के गुणांसह यश खेचून आणले आहे. दिघोरी परिसरात ती आपल्या कुटुंबियांसमवेत राहते. तिचे वडील हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात. तिची आई जया आजारी असते पण घरची आर्थिक परिस्थिती सावरावी म्हणून कंबर कसून उभी ठाकली आहे. परिसारातील घरांमध्ये धुणीभांडी करून घरखर्च भागविण्यासाठी ती हातभार लावते. तिची लहान बहीण मोहिनी ही आता नववीत आहे. अडचणींमध्येही हातपाय न गाळण्याची आणि प्रयत्नांची कास न सोडण्याची आपल्या आई-वडिलांची सवय पीयूश्रीमध्येही रुजली आहे. विषम परिस्थिती असतानाही संपूर्ण प्रयत्न करीत स्वकष्टाने तिने दहावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आहे. याच कष्टांच्या जोरावर उच्च शिक्षण घेण्याची तिची जिद्द आहे. केवळ उच्च शिक्षण नव्हे तर आयपीएस होण्याची खूणगाठ तिने मनात बांधली आहे. आज परिस्थित अनुकूल नसली तरी मोठे स्वप्न बघण्याचे धाडस या गुणी मुलीने केले आहे. केवळ अभ्यासाचेच नव्हे तर इतरही गुण पीयूश्रीने अंगी बाणविले आहेत. ती एक उत्कृष्ट योगपटू असून राष्ट्रीय स्तरापर्यंत तिने मजल मारली आहे. राष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये तिने सहभाग नोंदवून आपल्यातील या गुणाचीही चुणूक दाखविली आहे.
Percentage: 94.40 %
Account Details
Srushti Jitendra Dhengre
सोमलवार रामदासपेठ येथून सृष्टी ढेंगरे हिने दहावीची परीक्षा यंदा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तिने ९४ टक्के गुणांसहित आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. मानेवाडा रोडवरील बालाजीनगर परिसरात सृष्टीचे घर आहे. तिचे वडील ऑटोचालक होते. करोनाकाळाने त्यांच्याही समोर आव्हान उभे केले आहे. शहरात ऑटॊरिक्षा चालत नसल्याने त्यांचे उत्पन्न थांबले आहे. आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांना भंगारविक्रीच्या कामाकडे वळावे लागले. आई शालिनी गृहिणी असून तिला सातवीत शिकणारा एक भाऊदेखील आहे. शाळेतील शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये हुशार म्हणून सृष्टीची गणना होते. तिच्या पाठीमागेही शिक्षक तिचे कौतुक करण्यात शब्दांची कसूर करीत नाहीत. घरी अडचणी आहेत म्हणून सृष्टीने स्वप्न बघणे बंद केलेले नाही. तिच्या विश्वात तिने स्वतंत्र सृष्टी निर्माण केली आहे. या विश्वात ती स्वत:ला डॉक्टर झालेली आणि रुग्णांवर उपचार करताना बघते. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या सृष्टीकडे यासाठी गुणवत्ता आहे आणि कष्ट घेण्याची तयारीदेखील. आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीची तिला जाणीव आहे आणि स्वप्न पूर्ण करण्यात येणार्या अडचणींची. असे असले तरीही या अडचणींवर मात करून ठरविलेले लक्ष्य कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची जिद्द तिने बाळगले आहे.
Percentage: 94 %
Account Details
Sarthak Mohan Deshmukh
कोराडी येथील विद्यामंदिर शाळेत शिकणार्या सार्थकने दहावीच्या शालांत परीक्षेत ९० टक्के गुण मिळविले आहेत. सार्थकचे कुटुंब बोखारा परिसरातील बजरंग नगर परिसरात वास्तव्यास आहे. त्याचे वडील कोराडी येथील औष्णिक विद्युतकेंद्रात रोजंदारी कामगार आहेत. याशिवाय, त्याची ज्योत्स्ना आई जेवणाचे डबे करून घरखर्चाला हातभार लावते. सार्थकची पाठची बहीणही आता दहावीला आहे. बोखारा परिसरात हे कुटुंब भाड्याच्या घरात राहते. आर्थिक परिस्थिती अडचणीची असली तरी या कुटुंबाची मुलांना शिकविण्याची जिद्द उदंड आहे. पडेल ती तोशीस सहन करून मुलांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून द्यायच्या याकरिता सार्थकचे पालक सातत्याने प्रयत्न करीत असतात.त्यांच्या या प्रयत्नांची आणि आस्थेची जाणिव सार्थकला देखील आहे. दहावीची वेस आता कुठे ओलांडलेल्या या गुणी मुलाच्या डॊळ्यात उद्याची स्वप्ने तरळत आहेत. आयएएस होऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुधारायचे ही त्याची महत्वाकांक्षा आहे. ’कलेक्टर व्हायचे आहे’, सार्थक आपले स्वप्न बोलून दाखवतो. शिकण्याची आवड आणि डोक्यात ध्येय असलेला हा गुणवंत विद्यार्थी प्रयत्नांतही मागे नाही याची चुणूक त्याने दहावीत दाखवून दिली आहे. आपल्या आईबाबांनी आवडीने ठेवलेल्या नावाचे चीज करण्याची त्याची जिद्द आहे.