Mumbai Archives | Page 2 of 3 | MT Culture Club

mumbai

SHRAVANI SHIVAJI PATIL

अंबोली म्हातारपाडा परिसरात झावळ्या लावून कसेबसे उभ्या केलेल्या घरात पाटील कुटुंब राहते. काही वर्षांपूर्वी भंगाराचे पत्रे आणि बांबूच्या आधारावर हे घर उभे होते. अलिकडेच स्थानिक नगरसेवकाने पक्के घर बांधून दिले आहे. आणि इलेक्ट्रिशियन असलेल्या वडिलांना कायमस्वरूपी काम नाही. त्यांच्या कमाईवरच पाच सदस्यांचे कुटुंब अवलंबून आहे. मोठ्या बहिणीचे इंजिनीअरिंगचे शिक्षणही आर्थिक मदतीवरच अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय श्रावणी पाटील हिने ९१.४० टक्के गुण मिळवले आहेत. दहावीच्या या यशानंतर श्रावणीला एमबीबीएस पदवी मिळवून यशस्वी डॉक्टर व्हायचे आहे. नीट परीक्षेच्या तयारीसाठी श्रावणीने अॅलन इस्न्टिट्यूटची निवड केली आहे. मात्र फीअभावी प्रवेश रखडण्याची चिन्हे होती. दहावीचे टक्के पाहून सदर संस्थेने ४८ टक्के शिष्यवृत्ती दिली आहे. मात्र उर्वरित फीची चिंता कायम आहे. श्रावणीच्या मोठ्या बहिणीचे शिक्षण देखील एका ट्रस्टच्या आर्थिक मदतीतून सुरु आहे.

Percentage: 91.40 %

SAKSHI SUBHASH PATIL

दुर्गम आदिवासी भागातील काटाळे या छोट्या गावात चार कन्यारत्न असलेल्या सुभाष पाटील या भूमिहीन शेतमजुरांच्या घरातील थोरली कन्या साक्षी पाटील हिने ९१ टक्के गुण मिळवळे आहेत. डॉक्टर होण्याचे स्वप्न साक्षीने पाहिले आहे. वडील भाताच्या गिरणीत मशीन ऑपरेटर आहेत. दरमहा ७ हजार रुपये उत्पन्न त्यांना मिळते. हे काम हंगामी असल्याने इतरवेळी ते इतरांच्या शेतात काम करतात. मामाने दिलेल्या छोट्याश्या जमिनीच्या तुकड्यावर साक्षीच्या वडिलांनी छोटेशे घर बांधले आहे. गावापासून सहा किमी अंतरावर असलेल्या लालोंडे येथील स्व. विद्या विनोद अधिकारी शाळेत जाण्यासाठी साक्षीला एसटीचाच पर्याय होता. मोजक्याच एसटी फेऱ्या असल्याने ११ वाजताच्या शाळेसाठी ८ वाजता निघून अडीच तास अगोदर शाळेत पोहोचत. हा अडीच तासांचा वेळ साक्षीने सत्कारणी लावला. साक्षीच्या कठोर मेहनतीला शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शनाची जोड लाभली आणि ९१ टक्के गुणांचे यश तिच्या पदरी पडले. साक्षी आजही गावातील ५-६ मुलींची विनामूल्य शिकवणी घेते. दोन वर्षांपूर्वी महापुराचा फार वाईट अनुभव पाटील कुटुंबाच्या वाट्याला आला होता. साक्षीच्या स्वप्नाला आर्थिक पाठिंब्याची गरज आहे.

Percentage: 91 %

PAYAL SHAMSUNDAR PANCHAL

जेमतेम दीडशे चौरस फुटांचे घर, संयुक्त कुटुंब असल्याने दहा जणांचे वास्तव्य, वर्षभरापासून वडिलांचे काम बंद, जेवणाची कामे करण्यासाठी आईची धावाधाव अशा प्रतिकूल परिस्थितीत पायल पांचाळ हिने दहावीत ९४. २० टक्के गुण मिळवले आहेत. जोगेश्वरी पूर्वेकडील मजासवाडीत पांचाळ कुटुंब राहते. कुटुंबातील सदस्य आपापल्या कामासाठी बाहेर पडले की, मिळालेल्या वेळेत अधिकाधिक अभ्यास करण्यावर पायलने भर दिला. तिची अभ्यासाची उमेद आणि जिद्द पाहून जोगेश्वरीतील अरविंद गडभीर हायस्कुलमधील शिक्षकांनी देखील तिला सर्वतोपरी सहकार्य केले. पायलचे वडील मेस्त्रीचे काम काम करायचे. पण वर्षभरापासून त्यांचे काम सुटले आहे. लॉकडाउनमुळे नवे काम नसल्याने घरातील मिळकत पूर्णतः थांबली आहे. त्यामुळे आईने घरोघरी जेवणाची कामे करण्यास सुरुवात केली आहे. अशा हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या पायलला वित्त क्षेत्रात काम करायचे आहे. पण आर्थिक संकटे तिचा मार्ग रोखून आहेत. यासाठी तुला सहकार्याची गरज आहे

Percentage: 94.20 %

SAHIL SUNIL MANJALKAR

वडिलांच्या हाती काम नाही, घरकाम करणाऱ्या आईच्याच कमाईचा आधार, याच आर्थिक संकटामुळे मोठ्या बहिणीला शिक्षण सोडावे लागलेले.. असे नाउमेद करणारे वातावरण असूनही साहिल मांजलकर याने ९२.८० गुण मिळवले. साहिलचे वडील हिऱ्यांना पॉलिश करणाऱ्या कंपनीत कामाला होते. मात्र कंपनी सुरतला हलवण्यात आल्याने त्यांची नोकरी सुटली. घरखर्च भागवण्यासाठी त्याच्या आईने घरकाम करण्यास सुरुवात केली. मोठ्या बहिणीला बारावीनंतर शिक्षण सोडावे लागले असून, तुटपुंज्या पगाराची नोकरी ती करत आहे. मालाड पूर्व येथील महाराणी सईबाई विद्यामंदिरातून शिक्षण पुरे केलेल्या साहिलचे कुटुंब मालाडमधील अप्पापाडासारख्या दाटीवाटीच्या परिसरात अवघ्या ६ बाय १५ चौरस फुटांच्या भाड्याच्या घरात राहतो. आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती की, दहावीच्या वर्षात साहिलला थेट दिवाळीनंतर पुस्तके मिळाली. साहिलला बीटेक करायचे आहे. पुढील शिक्षणासाठी साहिल सज्ज आहे. त्याच्या पंखांमध्ये ताकद भरण्याची जबाबदारी दानशूर समाजावर आहे.

Percentage: 92.80 %

Bhagyashree Satish Gawade

वडील सुरक्षारक्षक, आई गृहिणी, मोठ्या भावाला नोकरी नाही. कुटुंबाचा गाडा वडिलांच्या अवघ्या १२ हजार रुपये पगारावर चालतो. भांडुपमधील हनुमान नगरसारख्या डोंगराळ भागात, आजूबाजूला सतत गजबजाट असलेल्या चाळीतील १० बाय १८ फुटांची अंधारी खोली भाग्यश्री गावडे हिने ९८.८० टक्के मिळवून प्रकाशमान केली आहे. प्राध्यापिका होऊन सजग पिढी घडवेन असे ध्येय असलेल्या भाग्यश्रीका 'सीए' पदवीही मिळवायची आहे. राहती खोली स्वतःची नाही. मिलमधील नोकरी सुटल्यानंतर, आपल्या मेव्हण्याच्या मदतीने पै पै जोडून ही खोली विकत घेतली. भाग्यश्रीने दहावीला शाळेतील शिक्षकांच्या सांगण्यावरून खासगी शिकवणी लावली. मात्र भाग्यश्रीची बुद्धिमत्ता पाहून क्लासमधून कधीही अडवणूक झाली नाही. अनेकदा शाळेच्या माजी मुख्याध्यापिका कल्पना परब यांनी भाग्यश्रीची फी भरली. पुढील शिक्षणासाठी भाग्यश्रीला आर्थिक मदतीची गरज आहे.

Percentage: 98.80 %

Payal Kisan Rane

Short Description :- डोंबिवली पूर्वेकडील ग्रामीण भागातील सागाव परिसरात पागडीच्या घरात आई-वडील व बहिणीसमवेत राहणाऱ्या पायल राणे हिने दहावीत ९०.८० टक्के गुण मिळवले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह जिच्यावर चालत होता, ती रिक्षा बँकेच्या कर्जामुळे विकावी लागल्याने वडील किसन राणे यांनी सुरक्षारक्षकाची नोकरी स्वीकारली. तर आई निला राणे सिलिंडरच्या झाकणासाठी धागे बनविण्याचे काम करतात. १००० धागे बनविल्यावर केवळ २८ रुपये हाती पडतात. त्यामुळे अधिक धागे गुंफण्यासाठी आपला अभ्यास सांभाळून पायल आपल्या आईला कामात मदत करते. या दररोजच्या जीवनसंघर्षातून सुटका करण्यासाठी सीए होण्याची तिची इच्छा आहे. मात्र वडिलांच्या तुटपुंज्या पगारात पुढील शिक्षण पूर्ण करणे अवघड आहे. पुस्तकांनाच आपली मैत्रीण मानून त्यांच्याशी हितगुज करणाऱ्या पायलला आर्थिक मदत मिळाल्यास सीए होण्याचे ध्येय ती सहज गाठू शकते, याचा तिला विश्वास आहे.

Percentage: 90.80 %

SHREYA DINESH CHANDORKAR

चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या श्रेयाने दहावी इयत्तेत ९३.८० टक्के मिळवले आहेत. गोवंडीतील बोरला गावात एका चाळीत चांदोरकर कुटुंब भाड्याने राहते. आई गृहिणी तर वडील दिनेश हे एका खाण्याच्या गादीवर आचाऱ्याचे काम करायचे. गेले चार महिने लॉकडाउनचा फटका त्यांनाही बसला आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांनी एका हॉटेलमध्ये छोटेखानी नोकरी स्वीकारली आहे. छोट्याशा घरातील जिन्याला श्रेयाने आपली अभ्यासिका बनवले होते. भविष्यात डॉक्टर होण्याची इच्छा असलेल्या श्रेयाला आर्थिक अडचणींमुळे करिअरचा मार्ग नाईलाजाने बदलावा लागेल अशी भीती सतावते. पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या धाकट्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी देखील उचलण्याचा निर्धार तिने आतापासूनच केला आहे. वैद्यकीय शिक्षणाची आस असलेल्या या विद्यार्थिनीला आता थोड्या मार्गदर्शनाची आणि आर्थिक मदतीची गरज आहे

Percentage: 93.80 %

Harshada Mangesh Rane

जोगेश्वरी पूर्वेच्या बालविकास मंदिर या शाळेची विद्यार्थिनी असलेली हर्षदा राणे हिने दहावीला ९४.४० टक्के मिळवले असून भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. त्यासाठीची जिद्द आणि चिकाटी, हे दोन्ही हर्षदाकडे आहे. पण बिकट आर्थिक स्थितीचा त्यात अडसर आहे. जोगेश्वरी पूर्वेला संजय नगरमध्ये आठ बे दहा'च्या लहानश्या घरात राणे कुटुंब राहते. हर्षदाचे वडील स्क्रीन प्रिंटिंगच्या कारखान्यात कामाला होते. मात्र कंपनी बंद पडली व हातचे काम गेले. घरचे मासिक ठोस असे उत्पन्न नाही. लॉकडाउनमुळे या आर्थिक अडचणींमध्ये भर पडली आहे. या परिस्थितीमुळे हर्षदाचे ध्येय पूर्ण करता आले नाहीतर? अशी अनामिक भीती तिच्या आई-वडिलांना मनात आहे. मात्र 'टार्गेट १०० टक्के' हे पोस्टर हर्षदाला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देते. या उर्जेला केवळ आर्थिक मदतीची दिशा हवी आहे

Percentage: 94.40 %

SHRUTI RAJENDRA SHIGWAN

वडिलांच्या महिना १० हजार रुपये पगारात घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि इतर घरखर्च भागविताना राजेंद्र शिगवण यांना कसरत करावी लागते. श्रुतीची आई प्रणिता यादेखील संसाराला हातभार लावण्यासाठी चार घरत पोळ्या लाटण्याचे काम करतात. या कष्टांची जाण असलेल्या श्रुतीने कुठल्याही शिकवणीशिवाय दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण प्राप्त केले आहेत. सहावीत असलेल्या लहान भावाचा अभ्यासाची जबाबदारी देखील श्रुतीने उचलली आहे. कोणतेही अवघड गणित सोडविण्यात हातखंडा असलेल्या श्रुतीने आता सीए होण्याचा निश्चय केला आहे. या शिक्षणासाठी मोठा खर्च येणार याची जाणीव असल्याने दहावीला चांगले गुण मिळवावेत आणि शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण पूर्ण करावे असा तिने चंग बांधला. उच्च शिक्षणाच्या पुढील टप्प्यावर देखील यशाची सोबत राहणार असल्याची खात्री श्रुतीला आहे. मात्र त्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे

Percentage: 94 %

BHUSHAN NANDKUMAR NARGOLKAR

अंबरनाथ येथील शिवाजी आबाजी कोळकर विद्यालयातून ९४.२० टक्क्यांसह भूषणने पहिला क्रमांक पटकावला आहे. नारगोळकर कुटुंब अंबरनाथ येथील पाठारे पार्क येथील वडिलोपार्जित घरात राहतात. भूषणचे वडील नंदकुमार नारगोळकर शहरातील दोन मंदिरात दैनंदिन पूजाअर्चा आणि उर्वरित वेळी घरगुती पौरोहित्याची कामे ते करतात. त्यातून जेमतेम सात हजार उत्पन्न मिळते. गेल्या चार महिन्यापासून मंदिरे आणि घरगुती पूजाअर्चा बंद असल्याने हे अल्प उत्पन्न आता बंद झाले आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भूषणसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा आहे. हा डोंगर सर करण्यासाठी भूषणला आर्थिक पाठबळाची गरज आहे. भूषणला अभ्यासाबरोबरच संगीताची आवड आहे. हार्मोनिअमच्या दोन परीक्षा तो उत्तीर्ण झाला आहे.

Percentage: 94.20 %

SHRUTI AJIT GUNJKAR

आईवडील दोघेही शारीरिक दिव्यांग. 'अपंग टेलिफोन बूथ'मधून रोजची जेमतेम दीडशे ते दोनशे रुपये मिळकत. याच टेलिफोन बुथमध्ये बसून वडिलांना कामात मदत करत श्रुतीने दहावीत ९४.६० टक्क्यांची कमाई केली आहे. वरळी येथील एका चाळीत राहणाऱ्या श्रुतीला बायोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करायचे आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे हे लक्ष्य तूर्तास अशक्य वाटते आहे. मोबाइलच्या जमान्यात टेलिफोन बूथवर कसेबसे चार ते पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. घरखर्च, वीजबिल, सिलेंडर आदी खर्च भागवून घर चालवताना तारेवरची कसरत होते. वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून आई-वडिलांनी दोन्ही मुलांचे शिक्षण सुरु ठेवले. त्यात लॉकडाउनमुळे टेलिफोन बूथ पाच महिने बंद असून एक नवा पैसे घरी येणे कठीण झाले आहे. आहे. परंतु, एकवेळ कमी खाऊ पण मुलांना चांगले शिक्षण देऊ असे त्यांनी ठरवले आहे. या निर्धाराला वाचकांच्या मदतीची साथ हवी आहे

Percentage: 94.60 %

VIKAS GAUTAM KHILLARE

अलीकडेच वडिलांचे निधन झाले. सध्या म्हातारी आजी, आई शालिनी, मोठा भाऊ आकाश व बहीण कोमल यांच्या समवेत विकास राहतो. घरगाडा चालवण्यासाठी आईसह आजीला देखील घरकामे करावी लागतात. जेमतेम ४ माणसं राहू शकतील, इतक्या छोट्या घरात खिल्लारे कुटुंब राहते. 'कपडे ठेवण्यासाठी जागा नसली तरी चालेल पुस्तके सुरक्षित राहायला हवीत' या विचाराच्या गौतम छोट्या जागेतही पुस्तकांचा खण बनवून घेतला आहे. दहावीचे वर्ष सुरु झाले तेव्हा आकाशला टीबीने लागण झाली. मात्र आजार देखील त्याला मागे खेचू शकला नाही. सतत वाचन, पाठांतर, वर्गात शिकवले जाणारे बारकावे लक्ष देऊन त्याने दहावीची पहिली पायरी ९०.८० टक्त्यांनी उत्तीर्ण केली. यादरम्यान बहिणीला देखील टीबीने ग्रासले. हे सर्व औषधपाणी करताना विकास याच्या आईला तारेवरची कसरत करावी लागते. आता गौतमला शिकून 'आयएएस' अधिकारी व्हायचे आहे. पुढील शिक्षणासाठी त्याला आर्थिक मदत हवी आहे.

Percentage: 90.80 %