Mumbai Archives | MT Culture Club

mumbai

SHRAVANI BALWANT NALAWADE

वडील पेशाने पेपरविक्रेते. तर आई गृहिणी. त्यामुळे वडिलांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीत पाच सदस्यांच्या कुटुंबाचा रहाटगाडा चालतो. मालाडमधील एका इमारतीत नलावडे कुटुंब भाड्याने राहते. याही प्रतिकूल परिस्थितीत श्रावनीने शिक्षणाची कास सोडली नाही. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने ९२.४० टक्के गुण मिळवले. तिचा छोटा भाऊ पाचवीला तर मोठी बहिण इंटेरिअर डिजाइनिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. तिला भविष्यात सीए किंवा सीएस अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.

Percentage: 92.40 %

SRINIVAS KRISHNANAND PRABHU

पेपरवाल्याचा मुलगा अशी तिरस्कारयुक्त हेटळणी सतत वाट्याला येत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रीनिवास प्रभू या पेपरविक्रेत्याच्या मुलाने ९३.४० टक्के गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाड्याचे घर, सतत आर्थिक चणचण, शिक्षणाला पोषक वातावरण नाही अशा प्रतिकूल वातावरणात श्रीनिवासने अभ्यास केला आणि हे यश मिळवले. इच्छाशक्तीला जिद्द, प्रयत्न आणि चिकाटी यांची जोड मिळाली तर यश मिळवू शकतो हे श्रीनिवासने दाखवून दिले आहे. त्याला कॉम्प्युटर सायन्समध्ये करिअर करायचे आहे.

Percentage: 93.40 %

CHARU SANJAY CHAVAN

वडिलांच्या तुटपुंज्या उत्पन्नात घरखर्चही भागत नसल्याने शैक्षणिक साहित्याची अडचण नेहमीचीच, शिवाय छोटेखानी घरात अभ्यासाला पुरेशी जागाही नाही. परंतु, त्याची कधीही तक्रार न करता आपल्या खडतर परिस्थितीची जाण ठेवत चारु चव्हाण दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत ९४.४० टक्के गुण मिळवले आहेत. कोमलला डॉक्टर बनायचे असून तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीचा मोठा अडसर आहे. खार पूर्ण परिसरातील दाटीवाटीच्या बैठ्या चाळीस चारु राहते. घरी आई-वडील आणि दोन छोट्या बहिणी असं चारुचं कुटुंब आहे. अगदी सात बाय दहाची खोली आणि पोट माळा. या पोटमाळ्यात बसूनच चारुनं रात्रीचा दिवस करत अभ्यास केला आहे. अरुंद वाट, पायाखालून जाणारी ट्रेनेज लाईन आणि दाटीवाटीचं राहणीमान. सध्या पावसाळ्यात तर छप्परही गळतंय. आई गृहिणी असून वडील संजय चव्हाण विमा एजंट म्हणून काम करतात. गेली दोन-तीन वर्षांपासून त्यांच्याकडून विमा उतरावणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. परिणामी पूर्वीच्या विमा धारकांकडून मिळणाऱ्या रिन्यूअल कमिशनवरच कसबसं घर चालते. आता तिचे डॉक्टर व्हायचे ध्येय असून, गरीब रुग्णांची सेवा करायची आहे. सध्या लॉकडाउनच्या दिवसात तर तिने प्रवेशपरीक्षणाचा अभ्यास करायलाही सुरुवात केली आहे

Percentage: 94.40 %

SAICHHA TUSHAR GAVKAR

ध्येय ठरलेले असले की त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कितीही कष्ट करायची काही जणांची तयारी असते. अशाच काही जणांपैकी कांदिवलीची साईच्छा गावकर. वडील पेपरविक्रेते आणि आई गृहिणी. दोन खोल्यांचे लहानसे घर. मात्र एका कोपऱ्यात असलेल्या घराने दिलेला निवांतपणा आणि जिद्द या बळावर साईच्छाने ९५ टक्के गुण मिळवले. तिला सीए व्हायचे आहे आणि त्यासाठी सगळी मेहनत घेण्याची तिची तयारी आहे. नववी आणि दहावीमध्ये साईच्छाने अधिक मार्गदर्शन मिळावे यासाठी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र त्या क्लासचे पैसे भरण्यासाठी तिच्या वडिलांना कर्ज काढावे लागले. तिच्या वडिलांचा चारकोपच्या बाजारामध्ये पेपरचा स्टॉल आहे. त्यांच्या भाच्यासोबत ते भागीदारीमध्ये हा स्टॉल चालवतात. त्या व्यतिरिक्त ते बदली वाहनचालक म्हणूनही कधी मिळाले तर काम करतात. मात्र यामुळे महिन्याचे जेमतेम १२ ते १४ हजार रुपयांची त्यांची मिळकत होते. आई-वडिलांना घेतलेल्या कष्टांचे चीज व्हावे म्हणून गरज पडली तर वडिलांना हातभार म्हणून नोकरीही करण्याची साईच्छाची तयारी आहे. करोनामुळे ती सध्या गावी आहे. मात्र गावी राहूनही उपलब्ध नेटवर्क, रेंजमुळे येणारी अडचण यावर मात करत तिने उपलब्ध मोबाइलच्या आधारे क्लासमधील व्याख्याने ऐकून अभ्यासाला सुरुवात केली आहे.

Percentage: 94 %

PRARTHANA PANDURANG UMAWANE

शहापूरच्या डोलखांब येथील लहानश्या गावातून पांडुरंग उमवणे उदर्निवाहासाठी कुटुंबासह शहरात स्थलांतरीत झाले. खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम मिळाले आणि कल्याणमध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहून संसार सुरू झाला. पत्नी आणि मुलगी असे त्रिकोणी कुटुंब असल तरी अपुऱ्या उत्पन्नामुळे परिस्थिती हलाखीची होती. परिस्थितीशी दोन हात करत मुलीच्या शिक्षणासाठीचा दहावी पर्यंतचा संघर्ष त्यांनी मोठ्या परिश्रमाने निभावला. प्रार्थनाची आई देखील पापड लाटणे, शिलाईकाम करणे अशा माध्यमातून कुटुंबाचा आधार बनण्याचा प्रयत्न करते. परंतु तुटपुंजा उत्पन्नावर मुलीच्या शिक्षणाचा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शिक्षणासाठीच्या खर्चाचा विचार आल्यानंतर पावले अडखळतात. मुलगी प्रार्थनानेही प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करून यशाचा डोंगर यशस्वी सर केला. दहावीमध्ये ९३.२० टक्के गुण मिळवण्यात प्रार्थनाला यश मिळाले. प्रार्थनाला शिक्षणाची आवड असून शिकून सीए व्हायचे स्वप्न तीने उराशी बाळगले आहे. कल्याणच्या चाळवजा खोलीतून अभ्यास करून तीला सीएचा गडही जिंकायचा आहे.

Percentage: 93.20 %

MEGHA MOHAN DEVNATH

भाड्याचे घर, वडील रिक्षाचालक, रिक्षाही शिफ्टवर.. त्यामुळे घरकाम करून कुटुंबाला हातभार लावणारी आई आणि आजी.. या सर्वांचे उत्पन्न जेमतेम. अशा परिस्थितीत कशी इमारतीच्या जिन्यावर बसून, तर कधी गच्चीवॉर जाऊन अभ्यास करत मेघाला मोहन देवनाथ या विद्यार्थिनीने दहावीत ९१.२० टक्के गुण मिळवले आहेत. तिचे एअर होस्टेस होण्याचे स्वप्न आहे. कुटुंबाच्या बिकट परिस्थितीमुळे मोठ्या बहिणीला इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. आता पैशांअभावी मेघाच्याही आकाशभरारीच्या स्वप्नावर पाणी पडणार का अशी चिंता पालकांना सतावू लागली आहे. ठाण्यातील माजिवडा गावात एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मोहन आणि उषा देवनाथ या दाम्पत्याला एकूण चार मुली आहेत. सर्व मुली शिक्षण घेत असूनमोठी मुलगी बीएसएसच्या दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत आहे. तर धाकट्या दोघी अनुक्रमे नववी आणि सहावीत आहेत. देवनाथ कुटुंबाचे माजिवडा येथील चाळीतील घराचे काम पुनर्विकासात रखडले आहे. बिल्डरकडून भाडे मिळत नसल्याने महिना आठ हजार पगारात घरभाडे, घरखर्च आणि मुलींच्या शिक्षण यासाठी आर्थिक गणित जुळवताना त्यांची तारेवरची कसरत होत आहे. अशावेळी केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून दुसऱ्या मुलीला देखील आपली आवड बाजूला ठेऊन करिअरचा मार्ग बदलावा लागू नये अशी देवनाथ दाम्पत्याची इच्छा आहे.

Percentage: 91.20 %

SHRUSHTI VINOD NALAWADE

सार्वजनिक घरातील एका कोपऱ्यात दीडशे चौरस फुटांच्या छोट्याश्या घरात सृष्टी नलावडे हिने गगनभरारी घेण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र कुटुंबासमोरील आर्थिक अडचणींमुळे सृष्टीच्या 'पायलट' होण्याच्या स्वप्नाला टेकऑफपूर्वीच ब्रेक लागला आहे. वडील वायरमनचे काम करतात. त्यांच्या तुटपुंज्या कमाईवरच पाच सदस्यांचे कुटुंब अवलंबून आहे. मोठ्या बहिणीचे पदवीचे शिक्षण देखील आर्थिक मदतीवरच.. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणताही क्लास न लावता केवळ जिद्दीच्या जोरावर दहावी परीक्षेत ९०.४० टक्के गुण मिळवणाऱ्या सृष्टीला स्वप्नपूर्तीसाठी आर्थिक इंधनाची गरज आहे. आकाशात झेपावणाऱ्या विमानउड्डाणाबाबत सृष्टीला लहानपणापासूनच आकर्षण होते. विज्ञानाच्या वर्गात कार्यानुभव म्हणून विमान तयार करण्याचा उपक्रमात तिने भाग घेतला. विमानाबाबत जिज्ञासा वाढली आणि पायलट व्हायचे या स्वप्नावर सृष्टीने शिक्कामोर्तब केले. दहावीला उत्तम टक्के मिळवल्यास शिष्यवृत्तीच्या मदतीने स्वप्नाला आकार देता येईल याचे ठोकताळे देखील सृष्टीने मनाशी बांधले. तिचे हे स्वप्न साकार व्हायला पाहिजे. सध्या तिच्या शिक्षणाची उड्डाणपूर्व स्थिती आहे. त्यात आर्थिक इंधनाची भर पडल्यास सृष्टीची गगनभरारी कोकण विभागाला आणखी एक पायलट मिळवून देईल.

Percentage: 90.40 %

YASH VASUDEV NIMBRE

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मोहोप्रे या गावात यश निम्बरे आपल्या कुटुंबासह राहतो. वडील रिक्षा चालवतात. रिक्षाच्या उत्पन्नाखेरीज दुसरे कोणतेच उत्पन्नाचे साधन या कुटुंबाकडे नाही. घर म्हणजे दहा बाय बाराची खोलीच. गावात शिक्षणासाठी पूरक असे वातावरण नाहीच. इतक्या खडतर परिस्थितीत अभ्यास करून यशाने दहावीत ९५.४० टक्के गुण मिळवले. दिवसातील जवळपास चौदा-पंधरा तास अभ्यास करून यशने हे यश मिळवले आहे. त्याला केमिकल इंजिनीअर व्हायचे आहे. आपल्या मुलाच्या यशाचे पेढेही वाटू शकलो नाही याची खंत त्याच्या वडिलांना आहे. यशचे कौशल्य पाहून शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकांनी कोणतीही फी न घेता त्याला शिकवण्याची तयारी दाखवली होती. सुरुवातीला लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात त्याच्या वडिलांना घरीच बसून राहावे लागले होते. त्यामुळे यशच्या कुटुंबाला अधिकच आर्थिक झळ बसली आहे. केमिकल इंजिनीअर होण्याचा मार्ग अडचणींचे डोंगर पार करायला लावणारा असला तरी कठीण नाही, हे यशही ठामपणे सांगतो.

Percentage: 94.40 %

PRERNA PANDURANG PATADE

चार भिंतीच्या आत अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेला संघर्ष अनेकदा भिंतीपलीकडील लोकांच्या नजरेस पडत नाही. एका शाळेच्या मैदानात साफसफाईचे काम रोजंदारीवर करणाऱ्या पांडुरंग पाताडे यांच्या कुटुंबाचा संघर्ष काहीसा असाच आहे. न दिसणारा.. चार-साडेचार हजार इतके तुटपुंजे उत्पन्न, घरभाडे व इतर खर्चाचा भार, आणि पाचवीला पुजलेली गरिबी.. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिकून त्यांची मुलगी प्रेरणा पाताडे हिने दहावीच्या परीक्षेत ९२.४० टक्के मिळवले आहेत. मालवणच्या भंडारी हायस्कुलमध्ये प्रेरणाने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. दररोज घरापासून अडीच किलोमीटर शाळेपर्यंत तंगडतोड करत हे यश तीन खेचून आणले आहे. पहिलीपासून दहावीपर्यंत तिला सतत प्रथम श्रेणी मिळाली आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत तिला मिळालेले हे यश उल्लेखनीय आहे. प्रेरणा जिद्दीने लढत आहे. बँक अधिकारी व्हायची इच्छा पूर्ण होण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. आज रोजी तिला कोणतीही मदत नाही. पण प्रेरणाने जिद्द सोडलेली नाही. गरिबीचे खाते रिक्त करण्याचे एकच ध्येय तिच्यासमोर आहे

Percentage: 92.40 %

SANDESH TUKARAM AVAKIRAKAR

सुधागड तालुक्यातील खडई (धनगरवाडा) गावापर्यंत पोहोचण्यासाठी धड रस्त्याचीही सोय नाही. मार्च महिना आला की पिण्याच्या पाण्यासाठी ५ किमीची पायपीट करावी लागते. झोपडीवजा घर (कुढामेडीचे) असून वडील झाडांना पाणी द्यायचे तर आई २-३ घरातील कामं करतात. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच.. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संगीत, वक्तृत्व, खेळाची आवड असलेल्या अष्टपैलू संदेश अवकीरकर याने ९३.४० टक्क्यांची घसघशीत कमाई केली आहे. भविष्यात मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचे स्वप्न त्याने बाळगले आहे. संदेशच्या वडिलांना जेमतेम अडीच ते तीन हजार उत्पन्न मिळते. आईच्या घरकामाचा थोडाबहुत हातभार लागतो. संदेशमागोमाग दहावी इयत्तेत असलेला भाऊ, सातवीत प्रवेश केलेल्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा आहे. मात्र दोन वेळचे जेवण देखील संघर्षाने मिळवावे लागते. तिथे शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनीअर होऊन यशस्वी कारकीर्द घडवून आईवडिलांना आपल्या हक्काच्या घरात नेण्याचा निर्धार त्याने मनाशी पक्का केला आहे.

Percentage: 93.40 %

SAKSHI HINDURAO GHADGE

कुर्ल्याचा बैलबाजारासारखा अत्यंत दाटीवाटीचा परिसरात शिंगरेवाडी ही बैठ्या चाळींची वसाहत. जेमतेम १२० चौरस फुटांचे घर, त्यात आईला कावीळ. आई बरी होत नाही, तोच भावाला डेंग्यू. हाती पुस्तकेही नाहीत. असे असतानाही साक्षी घाडगे हिने दहावीत तब्बल ९४.८० टक्के गुण मिळवले. वडील भाड्याची टॅक्सी चालवतात. तर आई मच्छरदाणी शिवण्याचे काम करतात. दोघांचेही काम तुटपुंज्या मिळकतीचे आहे. घरभाडे भरून इतर घरखर्चाची गणितं सांभाळणं कसरतीचे काम असते. दहावीच्या पूर्ण वर्षात तिला अभ्यासाची पुस्तके ऑक्टोबरनंतर म्हणजे निम्मे वर्ष सरल्यानंतर मिळाली. रात्रभर जागून अभ्यास करता यावा यासाठी वडिलांनी लहान ट्यूबलाइट आणून दिला. व तो खुर्चीला बांधून दिला. मात्र प्राप्त परिस्थितीशी सामना करत साक्षीने यश मिळवले आणि कुर्ला विभागात पहिली आली. आता 'सीए'सारखा कठीण अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तिची जिद्द आहे.

Percentage: 94.80 %

VRUTTI MAHENDRA KAMBLE

दहिसरमधील रावळपाडा या डोंगराळ भागातील एका टोकावरील वाघदेवीनगर वस्तीत वृत्ती कांबळे हिचे कुटुंब राहते. आई- वडील दोघेही इमिटेशन ज्वेलरीचे काम करतात. या कामातून महिन्याला फारतर १६ ते १७ हजार रुपये उत्पन्न मिळते. आजूबाजूला गोंगाट असल्याने सकाळची शांतता मिळणे कठीणच. अशावेळी रात्रभर अभ्यास करून वृत्तीने सहावी परीक्षेत ९४.९० टक्के गुण मिळवले. खरेतर डॉक्टर होण्याची इच्छा असलेल्या वृत्तीने प्राप्त परिस्थितीत त्यास मुरड घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी निर्लेप समाजसेवेसाठी सनदी अधिकारी होण्याचा निश्चय तिने मनाशी पक्का केला आहे. अभ्यासासह निबंध, वक्तृत्व सप्रधानमधील तिची चुणूक पाहून शालेय शिक्षकांसह खासगी क्लासने देखील नेहमीच मदतीचा हात पुढे केला. आजवर रोजंदारीवर सुरु असलेले काम सध्या लॉकडाउनमुळे ठप्प पडले आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे

Percentage: 94.90 %