MT Kalasangam Nashik

महोत्सवात हौशी कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. हौशी कलाकारांना आवाहन करण्यात येत आहे की, गायन, वादन, नृत्य, शिल्प, मॉडर्न आर्टमध्ये पीअर्सिंग, नेल आर्ट तसेच आणखीही संबंधित आर्टमध्ये ज्यांना परफॉर्मन्स सादर करावयाचे असतील, त्यांनी रजिस्ट्रेशन करावे. कलासंगम... नाशिकमधील कलाकारांच्या हक्काचा अन् आवडीचा मंच... प्रस्थापितांच्या कलांचे बहारदार सादरीकरण आणि उभरत्यांचे व्यासपीठ म्हणजे कलासंगम. रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा हा महोत्सव ‘मटा'च्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त ११ व १२ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. तालवाद्यापासून सुशीरवाद्यांपर्यंत सर्वांचाच समावेश यात असून, यंदाचा उत्सव नाशिककरांना नक्कीच हर्षोल्हास करणारा ठरणार आहे. अकराव्या वर्धापनदिनानिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स' व फ्रवशी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने कलासंगम महोत्सव होणार आहे. फ्रवशी अकॅडमी येथे दोन दिवस होणाऱ्या ‘मटा' कलासंगम महोत्सवाचे हे चौथे वर्षे असून, दोन वर्षांपूर्वी झालेल्या महोत्सवाला नाशिककरांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर करोना काळात डिजिटल स्वरूपात कार्यक्रम झाल्याने मध्ये खंड पडला. मात्र, आता कलाकार आणि रसिकांची शिगेला पोहोचलेली उत्सुकता लवकरच संपणार आहे. नाशिकमधील लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, गायन वादन, शिल्प, नृत्य नाट्य, चित्र, फोटोग्राफी सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा व नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी हा ‘कलासंगम' महोत्सवाचा उद्देश आहे. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या अन् सांस्कृतिक ठेवा जपतानाच स्मार्ट बनू पाहणाऱ्या या नगरीने अनेक कलारत्नांना मानसन्मान दिला. या रत्नांनीदेखील नाशिकचा बहुमान वाढविला. वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना एकत्रित करून एक व्यापक आर्ट फेस्ट होत असून, फेस्टमध्ये संगीत, वादन, नृत्य, चित्र, शिल्प या कलांचा संगम नाशिककर रसिकांना पहायला मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांचे परफॉर्मन्स, उत्तर भारतात गाजलेला एक अनोखा कार्यक्रम तसेच प्रसिद्ध मान्यवर चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन व डेमोन्स्ट्रेशनही यावेळी होईल. हौशी कलाकारांचे वादन, गायन व नृत्य यांचाही आस्वाद रसिकांना घेता येईल. त्यांच्यातील कलाविष्कार पाहण्याची, अनुभवण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या ‘आर्ट फेस्ट'ला हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.