
Planet Campus Seminar Series in association with BMCC, Pune ‘महाराष्ट्र टाइम्स'च्या ‘प्लॅनेट कॅम्पस'च्या व्यासपीठावर उद्या, शनिवारी आणि रविवारी (९ व १० जुलै) विद्यार्थ्यांना व्यवस्थापन या विषयात आणि परकीय भाषांमध्ये करिअर कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन मिळणार आहे. दहावी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमांची; तसेच नव्या करिअर संधींची माहिती व्हावी, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (बीएमसीसी) सहकार्याने ‘बीएमसीसी'च्या टाटा सभागृहात ही करिअर सीरीज होत आहे. या मालिकेत उद्या, शनिवारी (९ जुलै) सकाळी ९.३० ते १०.४५ या वेळात ‘करिअर इन मॅनेजमेंट अँड अॅडमिन' या विषयावर डॉ. शिखा जैन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी (१० जुलै) सकाळी ९.३० ते १०.४५ या वेळेत ‘करिअर इन लँग्वेजेस' या विषयावर डॉ. सविता केळकर मार्गदर्शन करतील. परकीय भाषा आणि व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रांमध्ये सध्या विविध पदांवर कार्यरत होण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होत आहे. व्यवस्थापन विषयाचा अभ्यास करून कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक मोठ्या हुद्द्यांवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते. याशिवाय परकीय भाषांचा अभ्यास करून भारतात आणि परदेशात करिअर करण्याच्या अनेक वाटा निर्माण होतात. याद्वारे विद्यार्थी परकीय भाषांच्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतात. या विषयीचे संपूर्ण मार्गदर्शन डॉ. जैन व डॉ. केळकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या नव्या करिअर संधींची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र टाइम्स'तर्फे करण्यात आले आहे.