
‘महाराष्ट्र टाइम्स'च्या ‘प्लॅनेट कॅम्पस'च्या व्यासपीठावर यंदा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, संरक्षण क्षेत्र (डिफेन्स) आणि कायद्यात (लॉ) करिअर कसे करायचे, याबद्दलचे मार्गदर्शन मिळणार आहे. दहावी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमांची; तसेच नव्या करिअर संधींची माहिती व्हावी, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (बीएमसीसी) सहकार्याने ‘बीएमसीसी'च्या टाटा सभागृहात ही करिअर सीरीज होत आहे. या मालिकेत येत्या शनिवारी (२ जुलै) सकाळी ९.३० ते १०.४५ या वेळात ‘करिअर इन डिफेन्स' या विषयावर लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) यांचे मर्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर १०.४५ ते १२ या वेळेत ‘करिअर इन एमपीएससी-यूपीएससी' या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान होईल. रविवारी (३ जुलै) सकाळी ९.३० ते १०.४५ या वेळेत ‘करिअर इन लॉ प्रोफेशन' या विषयावर अॅड. नितीन आपटे मार्गदर्शन करतील. संरक्षण क्षेत्रामध्ये सध्या विविध पदांवर कार्यरत होण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होत आहे. याशिवाय एमपीएससी-यूपीएससी या स्पर्धा परीक्षांद्वारे अधिकारी होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला असून, अधिकारी होण्यासाठी नेमक्या कशा पद्धतीच्या परीक्षा द्यायच्या, काय तयारी करायची, याबाबतही धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सध्या कायदेविषयक क्षेत्रामध्येही करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. या संदर्भातील माहिती या सीरीजमधून मिळू शकणार आहे. या नव्या करिअर संधींची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र टाइम्स'तर्फे करण्यात आले आहे.